आंबोली येथे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय कृतिसत्र संपन्न; शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांची प्रमुख उपस्थिती!
सिंधुदुर्ग (आंबोली):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुखाध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या यजमानपदाखाली दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चा व कृतिसत्राचे आयोजन पर्यटन दृष्ट्या प्रसिद्ध आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे करण्यात आले आहे. दिनांक ७ जून आणि ८ जून २०२६ रोजी आयोजित या कृतिसत्राच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन कोकण विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे चेअरमन मा. सुनील राऊळ होते, तर मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष मा. तानाजी माने यांनी प्रास्ताविक केले.
शिक्षकांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
कृतिसत्राच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सहाय्यक शिक्षण संचालक श्री. श्रीराम पानझाडे यांनी उपस्थित मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षण क्षेत्रात होणारे नवनवीन बदल, शिक्षण विभागाची धोरणे आणि त्यातील तांत्रिक अडचणी यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. शिक्षक व मुख्याध्यापकांच्या समस्या समजून घेत, शासन आणि प्रशासन स्तरावर सकारात्मक विचार करून विद्यार्थी, शिक्षक व शासनाचे हित जपत येत्या काळात सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे ९०० हून अधिक शाळांना दिलासा
चर्चासत्रादरम्यान मार्गदर्शन करताना सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. डोंगराळ आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्येअभावी अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत होते. या गंभीर समस्येवर आमदार म्हात्रे यांनी कोकणचे मंत्री मा. उदय सामंत आणि मा. नितेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर शिक्षणमंत्री मा. दादाजी भुसे यांच्या दालनात विशेष बैठक घेऊन, इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्गांसाठी किमान पटसंख्या २० करण्याचा ऐतिहासिक निर्णय मंजूर करून घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास ९०० पेक्षा जास्त शाळांना झाला असल्याचे सांगत सर्व मुख्याध्यापकांनी आमदार म्हात्रे यांचे आभार मानले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
“आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासारखा कार्यतत्पर शिक्षक आमदार मी अद्याप पाहिलेला नाही. शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, प्रधान सचिव, शिक्षणमंत्री ते थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सतत पाठपुरावा करून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात.”
— श्री. श्रीराम पानझाडे (सहाय्यक शिक्षण संचालक)
या राज्यस्तरीय कृतिसत्राला मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव श्री. सागर नंदकुमार, उपाध्यक्ष सर्वश्री सचिन नलावडे, सुनील घुगरे, सुनील पंडित, माजी अध्यक्ष श्री. जे. के. पाटील, विद्या समिती सचिव श्री. संजय झांबरे, श्री. सुनील भोर, तसेच या कृतिसत्राचे मुख्य आयोजक सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा एज्युकेशनल जर्नलचे संपादक श्री. वामन तर्फे, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव श्री. घावरे सर, माजी अध्यक्ष श्री. एम. जी. मातोंडकर, श्री. कुसगांवकर यांच्यासह राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







