ठळक घडामोडी

सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी ‘उबाठा’ची पहिली उमेदवार! सीमा मठकर रिंगणात, माजी खा.राऊत यांना विजयाची खात्री

सावंतवाडी


सावंतवाडी: आगामी सावंतवाडी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सौ. सीमा मठकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या रूपाने निवडणुकीसाठीचा हा पहिलाच अर्ज ठरला आहे.
सौ. सीमा मठकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र सादर केले.

अर्ज दाखल करताना पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते, ज्यात माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, आणि विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांचा समावेश होता.
विजयाचा विश्वास
यावेळी माध्यमांशी बोलताना माजी खासदार विनायक राऊत यांनी पक्षाचा विश्वास व्यक्त केला.

विनायक राऊत म्हणाले: “उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही सावंतवाडीत नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्व. आमदार जयानंद मठकर यांच्या सुनबाई सौ. सीमा मठकर रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विजयाची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

उमेदवाराचा दावा
तर, स्वतः उमेदवार सौ. सीमा मठकर यांनीही विजयाचा निर्धार व्यक्त केला.सौ. सीमा मठकर म्हणाल्या: “माझा विजय निश्चित आहे, तसेच माझ्यासोबत नगरसेवक पदाचे उमेदवारही या निवडणुकीत बाजी मारतील असा मला विश्वास आहे.”

सावंतवाडीत पहिल्याच दिवशी अर्ज दाखल झाल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे