सावंतवाडी, दि. ०२ (प्रतिनिधी):
रोटरी क्लब सावंतवाडीच्या सन २०२६-२७ या नूतन वर्षाकरिता अध्यक्षपदी रो. प्रवीण परब, सेक्रेटरी (सचिव) पदी रो. सुहास सातोसकर आणि खजिनदारपदी रो. प्रदीप शेवडे यांची एकमताने निवड करण्यात आली असून या नवनियुक्त कार्यकारिणीचा अधिकृत पदग्रहण सोहळा येत्या सोमवारी, ६ जुलै रोजी मळगाव येथील भगवती हॉल येथे उत्साहात संपन्न होणार असल्याची माहिती रोटरीचे मावळते अध्यक्ष रो. ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत बोलताना मावळते अध्यक्ष रो. भांबुरे यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेताना सांगितले की, रोटरी क्लबच्या माध्यमातून मागील वर्षभरात अत्यंत प्रभावीपणे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे ३३ विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आणि हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी व इनरव्हील क्लब सावंतवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान, १ जुलैपासून आपल्या नव्या कार्यकाळाची धुरा सांभाळणारे नवनिर्वाचित अध्यक्ष रो. प्रवीण परब यांनी आपल्या आगामी संकल्पनांविषयी माहिती देताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली ५४ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या या क्लबच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या वंचित आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचून काम करण्याचा त्यांचा मानस असून आगामी वर्षात समाजात वाचन संस्कृती वाढविणे, तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे व सामाजिक उपक्रम राबविण्यावर विशेष भर दिला जाईल, तसेच याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी आणि दोडामार्ग भागात ज्येष्ठ सनदी अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्याचा मानस आहे. या पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नूतन सचिव रो. सुहास सातोसकर, खजिनदार रो. प्रदीप शेवडे यांच्यासह रो. अनंत उचगावकर, रो. सत्यजित धारणकर, रो. सुधीर नाईक, रो. ॲड. जायबा धुरी आणि रो. आबा कशाळीकर आदी रोटरी क्लब सावंतवाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.







