दोडामार्ग :
शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने ‘अभंगवाणी’ हा भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय केला.
कार्यक्रमाची सुरुवात वारकरी दिंडीने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढत वारकरी संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध संतांचे अभंग सादर केले तसेच वारकरी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री. आनंद बामणीकर, श्री. तुळशीदास राऊळ तसेच कु. वैष्णवी कदम यांनीही भावपूर्ण अभंग सादर करून कार्यक्रमाची भक्तिमय उंची अधिक वाढविली.
संगीताची सुरेल साथ कु. दक्षता बाबुराव घोगळे व कु. स्वानंदी महेंद्र मणेरीकर यांनी हार्मोनियमवर केली. तबल्यावर कार्तिक अभंग व ओम गवस यांनी तसेच पखवाजावर गणेश ताटे यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुळशीदास राऊळ यांनी प्रभावीपणे केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संतपरंपरा, वारकरी संस्कृती आणि भारतीय अध्यात्मिक परंपरेची ओळख तर झालीच, शिवाय भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याची प्रेरणाही मिळाली. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे विद्यमान अध्यक्ष श्री विक्रांत विकासभाई सावंत, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.







