अंकुर निवारा केंद्रात ‘व्यावसायिकदृष्ट्या सक्षम महिला’ उपक्रमाचा शुभारंभ; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
सावंतवाडी:
समाजसेवा आणि आरोग्य सेवेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने आता महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी “व्यावसायिकदृष्ट्या सक्षम महिला” हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सावंतवाडी येथील ‘अंकुर निवारा केंद्र’ येथे या विविध व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. रूपा मुद्राळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जात आहे. हतबल, गरजू आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या ८ ते १० दिवसीय प्रशिक्षण वर्गात महिलांना मेहंदी आर्ट (प्रशिक्षक: साझिया पडवेकर) तसेच विविध हस्तकलेच्या वस्तू बनवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी लागणारे संपूर्ण साहित्य संस्थेमार्फत मोफत पुरवण्यात आले असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सचिव समीरा खलील, शरदिनी बागवे, हेलन निबरे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव हे विशेष सहकार्य करत आहेत.
महिलांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला महिला व बालविकास अधिकारी श्री. बापू शिंगारे, कनिष्ठ लिपिक श्री. सिकंदर आढाव, अधिपरिचारिका ऐश्वर्या कल्याणी, स्वयंपाकी वेदिका सावंत, कनिष्ठ काळजीवाहक तुलसीदास तावडे, सुरक्षा रक्षक जोशना रेडकर व ज्योती पालव, तसेच केअरटेकर निकिता कदम हे उपस्थित होते.







