ठळक घडामोडी

विक्रांत सावंतांच्या प्रगतीचा आलेख जिल्हा परिषद ते आमदारकीपर्यंत जावा!शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब-शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव

शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विक्रांत सावंत यांचा भव्य गौरव

सावंतवाडी | प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये माजगाव मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण व कृषी समिती सदस्यपदी निवड झालेले विक्रांत सावंत यांचा ‘शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी’च्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. “विक्रांत सावंत यांनी मोठी स्वप्ने पहावीत, त्यांचा प्रगतीचा आलेख जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून थेट आमदारकीपर्यंत जावा,” अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, चंद्रकांत सावंत, अमोल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

वारसा आणि कर्तृत्वाचा संगम

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विक्रांत सावंत यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की:

“विक्रांत यांना कै. भाईसाहेब सावंत आणि कै. विकास सावंत यांचा मोठा वारसा लाभला आहे. जनसामान्यांसाठी काम करण्याचा जो धडाका कै. अजित पवार यांच्यात होता, त्याच पद्धतीने विक्रांत यांनी कार्य करावे. जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारावी, हीच सदिच्छा.”

मोठी स्वप्ने पहा: संजू परब

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विक्रांत सावंत यांच्या स्वभावाचे आणि कामाच्या पद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “आज कै. विकास सावंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. विक्रांत यांच्यात मोठी क्षमता आहे. मी आमदार झाल्यानंतर त्यांनीही आमदारकीचे स्वप्न पहावे, त्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.”

जनसामान्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध: विक्रांत सावंत-(जिल्हा परिषद सदस्य)

सत्काराला उत्तर देताना विक्रांत सावंत भावूक झाले. ते म्हणाले:

  • यशाचे श्रेय: हा विजय ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद, मतदारांचे प्रेम आणि कुटुंबाच्या पुण्याईमुळे मिळाला आहे.
  • संकल्प: मिळालेल्या पदाचा उपयोग मी केवळ जनसामान्यांच्या कल्याणासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी करेन.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमात अमोल सावंत, वसुधा मुळीक, प्रा. केदार म्हसकर आणि दशरथ शृंगारे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रा. रूपेश पाटील यांनी घेतलेली विक्रांत सावंत यांची प्रकट मुलाखत, ज्यातून त्यांच्या भावी वाटचालीचा वेध घेण्यात आला.
याप्रसंगी सोनाली सावंत, के. टी. परब, नारायण देवरकर, सीमा मठकर, संप्रवी कशाळीकर, डॉ. सुमेधा नाईक-धुरी, नामदेव मुठे यांच्यासह शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले तर आभार डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी मानले.