तुळस (सिंधुदुर्ग):
वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि परिसरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी तुळस येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून श्री गोवर्धन मंदिर परिसरात वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशाल परब व तुळस ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वेताळ प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग–तुळस) यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी स्थानिक पातळीवर अडवून जमिनीत मुरवणे हा या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश आहे. यामुळे परिसरातील विहिरी व इतर जलस्रोतांची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून आगामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही.
वन्यप्राण्यांसाठी ठरणार महत्त्वाचा पाणवठा
तुळस येथील या बंधाऱ्यामुळे स्थानिक पाळीव जनावरांबरोबरच वन्यप्राण्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढते; ते रोखण्यासाठी त्यांच्या अधिवासाजवळच पाण्याची सोय करणे गरजेचे होते. त्यामुळे हा उपक्रम जलसंधारणासोबतच वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
लोकसहभाग आणि श्रमदान
या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग आणि श्रमदान पाहायला मिळाले. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच नारायण कुंभार, सदस्य जयवंत तुळसकर, सचिन नाईक, सदस्या चरित्रा परब, रतन कबरे आणि शिक्षक बबन घोडे पाटील उपस्थित होते.
तसेच वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन वासुदेव परुळकर व सचिव विवेक तिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली नाना राऊळ, महेश राऊळ, माधव तुळसकर, यशवंत राऊळ, निलेश राऊळ, रोहन राऊळ, सचिन राऊळ, प्रसाद भणगे, नाना सावळ, प्रदीप सावंत, संदीप गावडे, सदगुरू सावंत, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सुहास सावंत, सागर सावंत, प्रदीप परुळकर, प्रज्वल परुळकर, प्रमोद तांबोसकर, आनंद राऊळ, रोहित गडेकर, भूमी परुळकर व भार्गवी परुळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय, उद्यानविद्या महाविद्यालय (मुळदे) येथील रावे ग्रुपच्या ओम कुंभार, अरिन मोंडे, धनंजय साळवी, सिद्धार्थ चौधरी, यशराज पाटील, अमित टोकसिया व दिनेश बिश्नोई या विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन श्रमदान केले.
गावागावांत अशा प्रकारचे छोटे जलसंधारण प्रकल्प उभारले गेल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.






