सावंतवाडी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये १ सप्टेंबर रोजी रानभाजी महोत्सव, वृक्षारोपण, वृक्ष रक्षाबंधन आणि औषधी वनस्पतींची ओळख अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक वातावरणात या महोत्सवाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शाळा आवारात वृक्षारोपण करून झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली पाना-फुलांची पर्यावरणपूरक राखी शाळेतील कल्पवृक्षाला बांधून ‘वृक्ष रक्षाबंधन’ करत निसर्ग रक्षणाचा संकल्प केला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गाणी आणि कृतीतून निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.
रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन
मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात अळू, शेवगा, कर्टुले, केळफूल, भारंगी, अंबाडी, टाकळा, चिवारीचे कोंब, पेवगा, कुर्डू, भोपळ्याची फुले आणि त्रिफळा यांसारख्या दुर्मिळ रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. सोबतच पानफुटी, गवती चहा, तुळस, ओवा, वेखंड, अडुळसा आणि सुरपीन या औषधी वनस्पतींची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
महोत्सवात नाचणीची भाकर, अळुवड्या, पातोळ्या आणि शेवग्याची भाजी अशा अनेक पौष्टिक आणि चवदार पदार्थांची मेजवानी उपस्थितांसाठी खास आकर्षण ठरली.
मान्यवरांची उपस्थिती व कौतुक
या प्रसंगी सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकूर, सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती श्रीम. दिपाली भालेकर, माजी केंद्रप्रमुख श्रीम. सरिता मुननकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. समीक्षा खोचरे, उपाध्यक्षा श्रीम. पूनम तुयेकर, शिक्षण तज्ज्ञ श्री. दिलीप भालेकर, श्री. गुरुप्रसाद तेजम, श्रीम. जान्हवी वारीक, श्रीम. संगीता चव्हाण, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. सायली लांबर आणि मुख्याध्यापक श्री. केशव जाधव यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी रानभाज्यांचे आहारातील आणि आरोग्यातील महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, या उपक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षिका श्रीम. सायली लांबर आणि पालकांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमा दरम्यान शिक्षणतज्ज्ञ श्री. दिलीप भालेकर यांचा वाढदिवस फुलझाड देऊन साजरा करण्यात आला, तर श्रीम. सरिता मुननकर यांनी विद्यार्थ्यांना खाऊसाठी १,००० रुपयांची देणगी दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सायली लांबर यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर महोत्सवाची सांगता झाली.







