ठळक घडामोडी

प्रा. उषा परब यांच्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न-कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक तथा विश्व मराठी साहित्य भूषण, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन

मुंबई, दि. २८एप्रिल :

मुंबई जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवयित्री, कादंबरीकार व नाटककार प्रा. उषा परब लिखित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा विलेपार्ले येथील केशवराव घैसास सभागृहात उत्साहात पार पडला. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक तथा विश्व मराठी साहित्य भूषण, पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष तसेच कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ लेखिका नमिता कीर, मोनिका गजेंद्रगडकर, समीक्षक डॉ. अजित मगदम, एन. बी. पाटील, कार्यवाह दीपा ठाणेकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार व रंगकर्मी राजेश राऊत तसेच अनेक साहित्यिक व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा. उषा परब यांच्या ‘निसरड’ या बोलीभाषेवर आधारित कथासंग्रहासह ‘स्त्रियांची ओवीगीते : साज आणि स्वरूप’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. मान्यवरांनी या पुस्तकांचे अंतरंग उलगडून सांगत लेखिकेच्या साहित्यिक कार्याचे कौतुक केले व आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन प्रशांत राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्या प्रभू यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, शाखाध्यक्ष तसेच प्रकाश परब व त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष परिश्रम घेतले.