ठळक घडामोडी

देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण

देशात व राज्यात महायुती भक्कम; अंतर्गत मतभेद लवकरच संपुष्टात – प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण

महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण; २०२९ पर्यंत महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात नंबर एक करायचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांवर पडदा

सावंतवाडी, (दि. ५ डिसेंबर) – भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांच्या माध्यमातून येणाऱ्या महायुतीचा पाया राज्यात आणि देशात भक्कम आहे. महायुती सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी २०२९ पर्यंत महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात नंबर एकवर नेण्याचा संकल्प केला आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी आज सावंतवाडी येथे व्यक्त केला.
सावंतवाडी येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आरोप-प्रत्यारोप
राज्यात संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही प्रमाणात प्रलंबित आहेत. या निवडणुकांदरम्यान काही ठिकाणी नेतृत्त्व नसल्याने स्वाभाविकपणे अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, या सर्व प्रकरणांवर आता पडदा पडला आहे.
काही ठिकाणी निर्माण झालेली कटुता टाळण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून, आगामी नागपूर अधिवेशनादरम्यान यावर वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
अंतर्गत पक्षप्रवेशांवर लगाम
महायुतीतील अंतर्गत वादावर बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, “अलीकडील काळात कल्याण-डोंबिवली तसेच इतर काही संवेदनशील भागांत महायुतीतील अंतर्गत पक्षप्रवेशांसंदर्भात दोन्ही बाजूंनी आक्षेप होते.”
यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ मंडळी सध्या प्रयत्नशील असून, असे अंतर्गत पक्षप्रवेश होऊनयेत यासाठी आम्ही आगामी काळात समझोता करणार आहोत. यानुसार, योग्य वेळी निर्णय घेऊन महायुतीतील अंतर्गत प्रवेश टाळण्यासाठी लवकरच बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव भोसले, युवरराजजी श्रद्धाजीराव भोसले, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मंडगावकर, प्रसन्न देसाई, मनोज नाईक, ॲड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.