संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे गोपाळकाला उत्सव उत्साहात

निरवडे : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करून गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर कृष्णमय झाला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा तसेच गोप-गोपिकांची आकर्षक वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णावरील गीते, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
गोपाळकाल्याचे मुख्य आकर्षण ठरलेली दहीहंडी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात फोडली. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला. दहीहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकता, सहकार्य आणि सांघिक भावनेचे महत्त्व अनुभवता आले.
या उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या बाललीला, भारतीय संस्कृती व परंपरा यांची माहिती देण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दहीहंडीमुळे उत्सवाला विशेष रंगत आली.
यावेळी दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी, ठाणेचे चेअरमन डॉ. शेखर जैन, समन्वयक अजय बांदेकर, मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गोपाळकाला उत्सव आनंदी, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.








