आंबोलीत गोल्फ कोर्स, सावंतवाडीत बस पोर्टसह पर्यटन विकासालाही गती
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सिंधुदुर्गातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक होणार असून, या माध्यमातून शेकडो युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. उद्योजक सुनील पैकाणे यांच्या क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत कंटेनर डेटा एंट्री प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कंपनीचे मालक सुनील पैकाणे व संचालक संदीप रेडकर उपस्थित होते.आमदार केसरकर म्हणाले की, सुनील पैकाणे यांनी २०१० मध्ये बांदा-वाफोली येथे उद्योग सुरू केला असून, आज त्या उद्योगसमूहात सुमारे ७०० स्थानिक युवक कार्यरत आहेत. आता आडाळी एमआयडीसीमध्ये १०० कोटींची नवीन गुंतवणूक करून अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगासाठी एमआयडीसीमध्ये सहा एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत उद्योगमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक होणार आहे.
या प्रकल्पामुळे परिसरातील शेकडो तरुण-तरुणींना रोजगाराची मोठी संधी मिळणार असून, आडाळी एमआयडीसीत दर गुरुवारी एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहतील. अधिकाधिक उद्योग येथे आणून स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
उद्योजक सुनील पैकाणे यांनी सांगितले की, जागेचा ताबा मिळाल्यानंतर सहा ते आठ महिन्यांत उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे. कंपनीमध्ये किमान दहावी उत्तीर्ण व आयटीआय शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना प्राधान्य दिले जाईल. उद्योग उभारला जातो त्या परिसरातील स्थानिक युवकांना प्रथम रोजगार देण्याची कंपनीची भूमिका कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाफोली येथे कंपनीचे चार कारखाने असून, जागा उपलब्ध झाल्यास आणखी विस्तार करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विकासकामांना वेग; पर्यटनासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार केसरकर यांनी आगामी विकास आराखड्याचीही माहिती दिली. सावंतवाडीत बीओटी तत्त्वावर आधुनिक बस पोर्ट उभारण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. तळवणे येथे बोट निर्मिती कारखाना मंजूर झाल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
सिंधुरत्न योजनेअंतर्गत विविध विकासकामे सुरू असून, तिलारी येथे ॲम्युझमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स आणि ॲनिमल सेंटर, तसेच आंबोली येथे गोल्फ कोर्स व ॲडव्हेंचर स्पोर्ट्स प्रकल्प साकार करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शक्तिपीठ महामार्ग रेडीपर्यंत जोडणे, मुंबई-गोवा महामार्ग व कोकण एक्स्प्रेस हायवेला शक्तिपीठाशी जोडण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, सावंतवाडीमध्ये पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शिर्डीच्या धर्तीवर साई मंदिर उभारण्याचा मानस व्यक्त करताना वडील वसंतशेठ केसरकर यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून गरजू नागरिकांच्या सेवेसाठी कार्य करण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.
राजकीय आठवणींनाही उजाळा
यावेळी आमदार केसरकर यांनी आपल्या राजकीय प्रवासातील काही आठवणींनाही उजाळा दिला. अजित पवार यांच्यासोबतचे जुने संबंध, अर्थसंकल्प सादर करण्याची संधी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे समन्वयपूर्ण संबंध यांचा उल्लेख त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा मागितल्यानंतरही शिवसेनेचे कॅबिनेट मंत्रीपद कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.









