कुडाळ :
महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथील भाषा आणि संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या पुढाकारातून अमराठी रिक्षा, टॅक्सी तसेच अन्य वाहनचालकांना मराठी भाषा शिकविण्याचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील तब्बल एक लाख ५६ हजार अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांनी मराठीचे धडे घेतले, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष तथा साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी कुडाळ येथे दिली.
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागामार्फत रिक्षा, टेम्पो आदी वाहनचालक व वाहकांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत व्हावे, यासाठी राबविण्यात आलेल्या कार्यशाळेची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, खजिनदार अनंत वैद्य, सहसचिव सुरेश पवार, रुजारिओ पिंटो, संदीप वालावलकर, निलेश जोशी, अभिमन्यू लोंढे, दीपाली काजरेकर, वृंदा कांबळी, प्रा. संतोष वालावलकर, दीपक पटेकर, वर्षा वैद्य, दत्तात्रेय ऊर्फ बाळ पुराणिक आदी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी श्री. माने यांचीही यावेळी उपस्थिती होती.
डॉ. ढवळ म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने १९८९ मध्येच महाराष्ट्रात वाहन चालविण्याचे परमिट घेणाऱ्या अमराठी चालकांना मराठी बोलता येणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या ३६ वर्षांत या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली नव्हती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयात पुढाकार घेतल्यानंतर या उपक्रमाला मूर्त स्वरूप मिळाले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही या उपक्रमाला आर्थिक व संस्थात्मक पाठबळ दिले.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ अंतर्गत हा उपक्रम १ मे रोजी सुरू करण्यात आला आणि १५ ऑगस्ट रोजी त्याची सांगता झाली. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या दोन संस्थांवर या अभियानाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे सुमारे १६०० साहित्यिक, प्राध्यापक व कार्यकर्ते अमराठी वाहनचालकांना व्यवहारातील मराठी शिकविण्याच्या कामात सहभागी झाले. मोठा व अवघड अभ्यासक्रम न शिकवता, दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडतील अशी मराठी वाक्ये शिकविण्यावर विशेष भर देण्यात आला. दररोज चार वाक्ये या पद्धतीने चालकांना मराठी बोलण्याचा सराव करून देण्यात आला.
रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबेर आणि रॅपिडोच्या चालकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. मराठी बोलण्याचा न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने मराठी बोलण्यास प्रवृत्त करण्याचे महत्त्वपूर्ण काम कोमसापच्या कार्यकर्त्यांनी केले. प्रशिक्षणानंतर कोमसापचे प्रशिक्षक, साहित्यिक आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी चालकांची तोंडी परीक्षा घेतली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अमराठी बांधवांची संख्या तुलनेने कमी असली, तरी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आल्याचे डॉ. ढवळ यांनी स्पष्ट केले.
या परीक्षेत ७ हजार ७५० चालक अपयशी ठरले, मात्र त्यांनी पुन्हा अभ्यास करून परीक्षा देण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिल्याने आणखी अनेक अमराठी वाहनचालक स्वतःहून पुढे येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे येथे १७ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र वितरणाचा मोठा कार्यक्रम झाला. त्याचवेळी राज्यातील सुमारे ५० आरटीओ विभागांमध्ये उत्तीर्ण चालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना देण्यात येणारी प्रमाणपत्रेही आरटीओ अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली आहेत.
“नियम केवळ कागदावर असतात; मात्र त्यांची पूर्तता करताना मानवतेच्या दृष्टिकोनातून भाषा शिकविणे गरजेचे होते. साहित्यिकांचे कार्य केवळ कविता, कथा किंवा कादंबरी लेखनापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काही करण्याची संधी या उपक्रमातून मिळाली. मराठी भाषेचा जागर आणि उत्सव करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे डॉ. ढवळ यांनी सांगितले.
महाराष्ट्राने व्यवसायाची आणि उदरनिर्वाहाची संधी दिली आहे. त्यामुळे येथील भाषा शिकणे ही केवळ परवाना मिळविण्याची अट न राहता महाराष्ट्राशी जोडले जाण्याची प्रक्रिया व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उर्वरित अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांनीही पुढे येऊन मराठी भाषा शिकावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी केले, तर कार्यक्रमाची रूपरेषा जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी मांडली.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाच्या वतीने डॉ. प्रदीप ढवळ आणि आरटीओ अधिकारी श्री. माने यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आरटीओ अधिकारी श्री. माने यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विशेष आभार मानले. असे सामाजिक आणि भाषिक जनजागृतीचे उपक्रम सातत्याने राबवावेत, परिवहन विभाग तुमच्या सोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.







