ठळक घडामोडी

माजी सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांचे निधन; १९७१ च्या भारत-पाक युद्धातील लढवय्या हरपला

सातार्डा, दि. २४:
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील रहिवासी आणि देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित केलेले निवृत्त माजी सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातार्डा परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. ते ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार व इंजिनिअर जयराम (बाळा) पवार यांचे वडील होत.

१९७१ च्या युद्धात सक्रिय सहभाग आणि ३२ वर्षांची देशसेवा

हवालदार चंद्रकांत पवार हे अगदी लहान वयातच भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. त्यांनी सैन्यदलाच्या ‘एएससी’ (आर्मी सव्हिर्स कोर) मध्ये हवालदार पदावर तब्बल ३२ वर्षे प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवा बजावली. विशेष म्हणजे, १९७१ च्या ऐतिहासिक भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सैन्यदलाचा त्यांना प्रचंड अभिमान होता आणि त्यांची ही देशभक्ती त्यांच्या वागण्यातून नेहमीच दिसून येत असे.

सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही चंद्रकांत पवार यांची सेवावृत्ती थांबली नाही. त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) ‘एसटी बस चालक’ म्हणून १५ वर्षे यशस्वी सेवा केली. या काळात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागीय कार्यालयांतर्गत देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले डेपोमध्ये अत्यंत कर्तव्यदक्ष चालक म्हणून काम केले होते.

सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्यातील सैनिक कायम जागृत होता. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ते सातार्डा ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहत. सैनिकी शिस्तीप्रमाणे आपल्या बेल्टला व शूजला पॉलिश करून, कडक इस्त्रीचा युनिफॉर्म परिधान करून ते राष्ट्रध्वजाला कडक सॅल्यूट ठोकण्यासाठी जात असत. त्यांचा हा उत्साह आणि शिस्त तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली.

पवार हे सार्वजनिक कार्यात आणि समाजसेवेत नेहमीच अग्रभागी असायचे. गावातील सार्वजनिक रस्ता मंजूर व्हावा आणि त्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी थेट उपोषण आंदोलन करण्याची तयारीही त्यांनी दाखविली होती. त्यांच्या या लढाऊ आणि समाजभिमुख वृत्तीमुळे गावात त्यांना मोठा मान होता.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, भाऊ, बहीण, वहिनी, पुतणे, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.