ठळक घडामोडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे परबवाडीत १० फूटांचा भलामोठा अजगर पकडला; कोंबड्यांच्या शेडमध्ये धुमाकूळ


सावंतवाडी प्रतिनिधी :

तळवडे येथील परबवाडी–थळकर देवघर परिसरात मकरंद परब यांच्या कोंबड्यांच्या शेडमध्ये तब्बल १० फूट लांबीचा भलामोठा अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या अजगराने शेडमधील ४ ते ५ कोंबड्या फस्त केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वनखात्याच्या आर.आर.टी. पथकातील अधिकारी बबन रेडकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
रेडकर यांनी अत्यंत तत्परतेने आणि सुरक्षितरीत्या अजगराला पकडून त्याची सुटका केली. त्यानंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक वन्य अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
सध्या परिसरात अजगरांचे प्रमाण वाढत असल्याच्या घटना समोर येत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः वस्त्यांजवळ व पशुपक्ष्यांच्या शेडमध्ये अजगर आढळून येत असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.
या वेळी ग्रामस्थांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून अजगराला सुरक्षित पकडल्याबद्दल बबन रेडकर यांचे आभार मानले.