ठळक घडामोडी

धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे

धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे

मळगाव

धाकोरे शाळा नंबर १ येथे खास शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच गावातील ग्रामस्थांना आपल्या ऐतिहासिक शिवकालीन साधनांची (शस्त्रांची ) माहिती व ती शस्त्र प्रत्यक्षरीत्या हाताळण्याची संधी धाकोरे शाळा नंबर १ व ग्रामस्थांच्या सहकार्याने धाकोरे गावात प्रदर्शनातून उपलब्ध करून देण्यात आली.

शिवकालीन इतिहास विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानातून अवगत आहेच.मात्र त्या काळातील शस्त्र कशा प्रकारे होती आणि ती प्रत्यक्षरित्या हाताळण्याची संधी मुलांना व ग्रामस्थांना धाकोरे शाळेच्या वतीने इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे व त्यांचे सहकारी आबा चिपकर यांच्या सहकार्यातून उपलब्ध करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांबरोबर,पालक ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून या शाळेच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशश्री पवार ,उपाध्यक्ष रविंद्र मुळीक, धाकोरे पोलीस पाटील धाकोरे श्रीराम प्रभुराळकर , रेडी पोलीस पाटील सिताराम राणे ,इतिहास संशोधक ज्ञानेश्वर राणे, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी चे आबा चिपकर, शाळा धाकोरे वसवाचे तळे मुख्याध्यापक अर्जुन रणशूर ,नितीन गावडे ,निलेश परब आदी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगणे आणि शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष जाणीव व्हावी या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रदर्शनात मराठा शस्त्रागारातील शस्त्र मराठा धोप, दांडपट्टा, कट्यार ,बिचवा, वाघनखे, खंडा तरवार, नागीन तरवार, ढाल, जिरेटोप, तोफ यांच्या प्रतिकृती तसेच ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन विद्यार्थी ,पालक, ग्रामस्थ यांच्यामध्ये विशेष आकर्षण ठरले.
प्रदर्शनात ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिवकार्याचे महत्त्व ,विविध गड किल्ल्यांची माहिती देत शिवकालीन साधनांची प्रात्यक्षिक करून माहिती दिली. यावेळी मुलांनी प्रत्यक्षरित्या शिवकालीन शस्त्रे हाताळली.
सरपंच स्नेहा मुळीक यांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे व त्यांचे सहकारी यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिगंबर तळणकर मुख्याध्यापक, सूत्रसंचालन सोनल जाधव तर आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचे नियोजन प्रेरणा गोवेकर सहाय्यक शिक्षिका धाकोरे नं.१ यांनी केले.