सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील परिवहन महामंडळाशी संबंधित विविध प्रलंबित समस्यांबाबत आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यातील एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सावंतवाडी एसटी स्थानकाच्या आराखड्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सादरीकरण करण्यात आले. या आराखड्यात काही आवश्यक बदल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, पुढील चार दिवसांत सुधारित आराखड्याचे पुन्हा सादरीकरण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी ३० नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी पाच बसेस सावंतवाडी आगाराला प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली. यावर मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी १५ नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामध्ये सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांना प्रत्येकी पाच बसेस मिळणार आहेत.
सावंतवाडी मतदारसंघातील अनेक गावे दुर्गम व डोंगराळ भागात असून, काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. तसेच अनेक गावांमध्ये बस वळविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने एसटी सेवा सुरू ठेवताना अडचणी निर्माण होत आहेत. कमी भारमानामुळे काही बसफेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. या समस्येवर मिनी बस हा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे सांगत आमदार केसरकर यांनी मतदारसंघातील तिन्ही डेपोंसाठी तातडीने मिनी बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ही मागणी तत्त्वतः मंजूर करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरात लवकर मिनी बसेस उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
वेंगुर्ले आगारातील सीएनजी बसना सीएनजी भरण्यासाठी सुमारे चार किलोमीटर अंतरावरील खासगी सीएनजी पंपावर जावे लागते. वाहतूक कोंडीमुळे यामध्ये बराच वेळ जात असून, ये-जा करण्यासाठी तब्बल आठ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, श्रम आणि इंधनाचा अपव्यय होत असल्याचा मुद्दा आमदार केसरकर यांनी बैठकीत मांडला.
वेंगुर्ले एसटी बस डेपोमध्ये सीएनजी युनिट मंजूर असूनही ते अद्याप सुरू झालेले नाही. एमएनजीएलमार्फत मंजूर असलेले हे सीएनजी युनिट तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार केसरकर यांनी केली. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजूर सीएनजी युनिटचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, वेंगुर्ले ते बोरिवली ही बंद असलेली एसटी बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशीही आग्रही मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली. या मागणीवर तात्काळ उचित कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
एसटी महामंडळातील काही कर्मचारी आरटीओ विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याने एसटीच्या मूळ सेवेवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. एसटी महामंडळाकडे आधीच कर्मचारी संख्या अपुरी असल्याने आरटीओकडे प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटी महामंडळाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली. लवकरच आरटीओ विभागात भरती प्रक्रिया होणार असून, त्यानंतर एसटी महामंडळाचे कर्मचारी पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी कार्यरत होतील, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ही बैठक चांगल्या प्रकारे संपन्न झाली. बैठकीला राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (बांधकाम) दिनेश महाजन, कार्यकारी अभियंता बांधकाम मुंबई प्रदेश, सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. घोडे, आर्किटेक्ट हुजेफर भोल, सुरज शेट्टी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.







