ठळक घडामोडी

वेंगुर्ला-चिपी टप्पा-२ व तिलारी पाणीपुरवठा योजना नाबार्डच्या माध्यमातून मार्गी लागणार! मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व उपस्थितीत मंत्रालयातील मंत्री दालनात ही बैठक संपन्न

वेंगुर्ला-चिपी टप्पा-२ व तिलारी पाणीपुरवठा योजना नाबार्डच्या माध्यमातून मार्गी लागणार! मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व उपस्थितीत मंत्रालयातील मंत्री दालनात ही बैठक

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई,

तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना तसेच तिलारी पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याचा टप्पा-१ या योजना शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्याच्या अनुषंगाने आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व उपस्थितीत मंत्रालयातील मंत्री दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजना नाबार्ड योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याच्या दृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जीवन प्राधिकरण ठाणेचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेलचे अधीक्षक अभियंता, नाबार्ड पुणेचे सहाय्यक महाप्रबंधक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्गचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर योजनांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून येत्या १५ दिवसांत नाबार्ड योजनेअंतर्गत मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.

मळगावसह विविध गावांना पाणीपुरवठ्याबाबत सकारात्मक चर्चा

बैठकीत सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, ब्राह्मणपाट, कुंभार्ली, सोनुर्ली, न्हावेली आदी गावांसह सावंतवाडी रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. या गावांचा व सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा योजनेत समावेश करून येत्या १५ दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पर्यटन, उद्योग व चिपी विमानतळाला मिळणार चालना

वेंगुर्ला-चिपी टप्पा-२ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास या भागातील उद्योगधंदे, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटन व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार असून, भविष्यात चिपी विमानतळाच्या विस्ताराच्या दृष्टीनेही या योजनेचा फायदा होणार आहे.

किनारपट्टी भागातील गावांना विशेषतः मार्च ते मे या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या योजनेमुळे संबंधित गावांची पाणीटंचाई दूर होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला भविष्यात मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.