ठळक घडामोडी

UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे आखाती देशात प्रथमच गडावर शिवजयंती उत्साहात साजरी

मुंबई

UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे आखाती देशात प्रथमच गडावर शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपतर्फे विशेष ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या Jebel Jais, रास अल खैमाह (RAK) येथे डोंगररांगांमध्ये महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत शिवजयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. आखाती देशात अशा प्रकारे डोंगररांगांमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होण्याची ही पहिलीच घटना ठरली.

ट्रेकदरम्यान शिवगर्जना आणि घोषणांनी आसमंत दणाणून गेला. उपस्थितांनी महाराजांच्या शौर्यगाथांचा जागर करत देशभक्तीची भावना प्रकट केली.

या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन UAE मध्ये महाराष्ट्र ग्रुपचे अध्यक्ष शुभम कोपर्डे आणि राहुल करिवडेकर यांनी केले होते. त्यांच्या सुयोग्य नियोजनामुळे कार्यक्रम सुरळीत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच या सोहळ्यासाठी वर्षा काजरेकर, शुभांगी घुमडे, प्रतीभा पवार, स्वप्ना अर्वीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी वारसा संस्कृतीचा चे अध्यक्ष मा. श्री. कल्पेश भालेकर यांनी सादर केलेल्या युद्धकलेने सर्वांना प्रेरित केले. मर्दानी खेळाच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

सर्वांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशात राहूनही सह्याद्रीत शिवजयंती साजरी केल्याचा भावनिक अनुभव उपस्थित ट्रेकर्सना आला. डोंगररांगांमध्ये घुमणाऱ्या शिवगर्जनांमुळे क्षणभर सर्वांना आपण महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर असल्याचा ‘सह्याद्रीचा’ अनुभव मिळाला. परदेशात राहूनही महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि स्वराज्याचा संदेश जपणारा हा उपक्रम यूएईतील मराठी समाजासाठी अभिमानास्पद ठरला.