सावंतवाडी:
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “केसरकरांना केवळ टार्गेट करणाऱ्यांनी आमदार मिलिंद नार्वेकरांच्याही राजीनाम्याची मागणी करावी,” असा टोला त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांना लगावला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ठळक मुद्दे:
- नार्वेकरांच्या राजीनाम्याची मागणी: संजू परब म्हणाले की, मोर्चा काढण्याची आणि राजीनामा घेण्याची भाषा करणाऱ्या रुपेश राऊळ यांनी आधी मिलिंद नार्वेकरांबद्दल बोलावे. अशोक खरातसोबत त्यांचेही फोटो जनतेने पाहिले आहेत, त्यामुळे सर्वपक्षीय मोर्चा काढताना त्यांचाही राजीनामा मागितला पाहिजे.
- उद्धव ठाकरेंवर निशाणा: भोंदूबाबा अशोक खरातला ४० किलोमीटरवरून पाणी पुरवणाऱ्या उद्धव ठाकरेंचाही निषेध राऊळ यांनी नोंदवायला हवा, अशी टीका परब यांनी केली.
- केसरकरांची पाठराखण: दीपक केसरकर हे देवभक्त आहेत. कुठेही मंदिर दिसले की ते थांबून दर्शन घेतात. कोणाच्या कपाळावर काय लिहिले आहे हे कोणालाही माहिती नसते, त्यामुळे त्यांच्यावर उगाच आरोप करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
- काँग्रेसवर टीका: जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपलेला आहे. ज्यांची दोनदा अनामत रक्कम जप्त झाली, त्यांच्यावर आम्ही बोलत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
उपस्थित मान्यवर:
या पत्रकार परिषदेला पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिलवे, उत्कर्षा गांवकर, क्लिटस फर्नांडिस, महादेव पांगम आदी पदाधिकारी उपस्थित होते.







