
आंबोली
आंबोली येथील युनियन इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या १९९६ च्या बॅचचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा नुकताच अतिशय उत्साहात, आनंदात आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. तब्बल तीन दशकांनंतर (३० वर्षांनी) एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संपूर्ण दिवस आनंदाने व्यतीत केला.
या विशेष सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी विद्यार्थी महेश सावंत, रोशन राऊत तसेच निलेश नार्वेकर यांनी भूषवले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान सर्वच माजी विद्यार्थी बालपणीच्या आणि शाळेच्या दिवसांत हरवून गेले होते. वर्गातील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्या काळातील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. शाळेचे दिवस संपल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात केलेला संघर्ष, अनुभवावा लागलेला खडतर प्रवास आणि आज विविध क्षेत्रांत मिळवलेले यश यावर सर्वांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. अनेक वर्षांनंतर एकमेकांना भेटल्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.
या स्नेहसंमेलनानिमित्त विविध मनोरंजक खेळ आणि गप्पागोष्टींचे आयोजन करण्यात आले होते. सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून संपूर्ण दिवस मनसोक्त मोजमस्ती, गाणी आणि आनंदात घालवला. सकाळपासून सुरू झालेल्या या भरगच्च आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार झालेल्या सोहळ्याचा समारोप संध्याकाळी अत्यंत भावूक वातावरणात आणि ‘पुन्हा लवकरच भेटू’ या आश्वासनाने करण्यात आला.या मेळाव्या यशस्वी करण्यासाठी १९९६ च्या बॅचच्या सर्वच सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली होती.







