
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघ, सावंतवाडी यांच्या वतीने अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम गुरुवार, दि. २३ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत नगरपालिका इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे येथील खाद्यपदार्थ तज्ज्ञ, अन्नपदार्थ सल्लागार व प्रशिक्षक श्री. अकुंश जोगदंड हे मार्गदर्शन करणार आहेत. सुरक्षित अन्ननिर्मिती, अन्नसुरक्षा नियम, आवश्यक प्रमाणपत्रे, आरोग्य संरक्षण तसेच अन्न व्यवसायाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर ते सविस्तर माहिती देणार आहेत.
या कार्यक्रमासाठी किराणा दुकानदार, हॉटेल व खानावळ चालक, बेकरी, मिठाई व्यावसायिक, कोल्ड्रिंक्स विक्रेते, खाद्यपदार्थ स्टॉलधारक, मासे, चिकन, अंडी व मटण विक्रेते, दूध विक्रेते, चायनीज पदार्थ विक्रेते, फरसाण तयार करणारे, भट्टी व्यवसायिक, वडापाव, समोसा, भजी, चहा विक्रेते, कॅटरिंग व्यावसायिक, विविध धान्यांपासून पीठ तयार करणारे तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व पाणी विक्री करणारे व्यावसायिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणास उपस्थित राहताना नोंदणीसाठी आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. जगदीश मांजरेकर यांनी सांगितले आहे. संबंधित सर्व व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांनी या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाचा लाभ घेऊन अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी सज्ज व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.







