स्वामी समर्थांच्या पादुकांचे १६ रोजी सावंतवाडी राजवाड्यात आगमन.
सावंतवाडी
अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुकांच मंगळवार, १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल येथे आगमन होणार आहे. या चरणकमलांचे दर्शन श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र,कर्नाटक व गोवा राज्यांतील भाविकांसाठी दिव्य दर्शन दौऱ्यांतर्गत या पादुका सावंतवाडीत येत आहेत. या पवित्र पादुका तिन्ही राज्यांतील प्रमुख नगरात भाविकांच्या दर्शनासाठी ६ डिसेंबरपासून दौरा करणार आहेत. या प्रवासात सातारा, फलटण, मिरज, सांगली, मुधोल, होंडा, पणजी, सावंतवाडी, कागल, कोल्हापूर, भोर, पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व नगरांमध्ये भाविकांना पादुकांचे दर्शन घेण्याचा योग येणार आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्यात मंगळवार, १६ डिसेंबर रोजी पवित्र पादुकांचे आगमन होणार आहे. या पादुकांची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांना दर्शन व आशीर्वादाचा लाभ घेता येणार आहे. सकाळी १०.३० ते रात्री आठपर्यंत या पादुका राजवाड्यात असणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेम सावंत-भोसले, श्रीमंत शुभदादेवी भोसले,युवराज लखम सावंत भोसले यांनी केले आहे.







