सावंतवाडी:
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या गुरुवारी, ३० एप्रिल२०२६ रोजी मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, पत्रकारांच्या पाल्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रमही पार पडणार आहे.हा सोहळा गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सावंतवाडी येथील शिल्पाग्राम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. श्री. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
याव्यतिरिक्त जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्यासह सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी विविध स्मृती प्रीत्यर्थ दिले जाणारे आदर्श पत्रकार आणि समाजसेवक पुरस्कार जाहीर झाले आहेत. सन्मानित होणारे मुख्य पुरस्कारप्राप्त मान्यवर खालीलप्रमाणे आहेत:
- श्री. रुपेश हिराप: वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार.
- श्री. भगवान शेलटे: कै. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार.
- सौ. मंगल नाईक-जोशी: माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार.
- श्री. अभय पंडित: जीवनगौरव पुरस्कार (कै. पांडुरंग स्वार स्मृती प्रीत्यर्थ).
- श्री. संतोष परब: स्व. त्रि. अ. उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार.
- श्री. हेमंत काळसेकर: ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्कार.
यावेळी मुख्य पुरस्कारांव्यतिरिक्त, विशेष प्राविण्यप्राप्त पत्रकार आणि पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर आणि सहसचिव विनायक गांवस यांनी तालुक्यातील सर्व नागरिक आणि पत्रकार बांधवांना या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.







