ठळक घडामोडी

शक्तीपीठ महामार्गाला नवा मार्ग मिळणार? मळगावमार्गे रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग व कोकण एक्स्प्रेस हायवेशी जोडण्याची मागणीआमदार दीपक केसरकर यांच्या मागणीची दखल; नव्याने पाहणी करून सकारात्मक सर्वेक्षणाचे संकेत आमदार केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

शक्तीपीठ महामार्गाला नवा मार्ग मिळणार? मळगावमार्गे रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग व कोकण एक्स्प्रेस हायवेशी जोडण्याची मागणी
आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीची दखल; नव्याने पाहणी करून सकारात्मक सर्वेक्षणाचे संकेत


सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाचा सध्याचा प्रस्तावित मार्ग कोकणाच्या विकासासाठी अपेक्षित परिणाम साधणारा नसल्याने त्यामध्ये बदल करून हा महामार्ग मळगाव येथून रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग तसेच प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी पुन्हा पाहणी करून सकारात्मक सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
केसरकर म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग सध्या ज्या पद्धतीने प्रस्तावित आहे, त्यामुळे विशेषतः वेंगुर्ला बंदराच्या विकासाला अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे कोकणातील स्थानिक अर्थव्यवस्था, बंदर विकास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महामार्गाच्या मार्गात बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार मळगाव येथून रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग आणि प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडणारा मार्ग निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हा मार्ग मळगाव येथून जोडल्यास रेडी बंदराच्या मालवाहतुकीला मोठी गती मिळेल. तसेच या कनेक्टिव्हिटीमुळे वेंगुर्ला बंदराचा आर्थिक व पर्यटन विकासही वेगाने होण्यास मदत होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
शक्तीपीठ महामार्ग मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडल्यास कोकणातील वाहतूक अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. स्थानिक व्यापारी, उद्योजक आणि पर्यटन व्यवसायाला थेट मोठ्या बाजारपेठेशी जोडण्याची संधी निर्माण होईल. त्यामुळे प्रस्तावित मार्गाबाबत पुन्हा सर्वेक्षण करून योग्य तो बदल करणे गरजेचे असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शक्तीपीठ महामार्ग थेट कोकणाशी जोडण्यास बांदा परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याने मोठ्या प्रमाणावर फळबागायतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागातील लागवडीचे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे. नव्या प्रस्तावानुसार आंबोली चौकातून पाटारकडे, त्यानंतर मोर्ले-पारगड मार्गे दोडामार्ग, तिलारी मार्ग आणि पुढे उत्तर गोव्याशी कनेक्टिव्हिटी साधण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी व परिसरातील नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. देशाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची ही महत्त्वाची संधी असून युवकांसह सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरात सोमवारी भव्य ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली असून या यात्रेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही केसरकर यांनी केले.
दोडामार्ग-सावंतवाडी पंचायत समितीच्या आमसभेचा मार्ग मोकळा
दोडामार्ग आणि सावंतवाडी पंचायत समितीच्या आमसभांबाबतही केसरकर यांनी माहिती दिली. प्रशासकीय राजवट संपल्यानंतर पुन्हा लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाल्याने आमसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार दोडामार्ग आणि सावंतवाडी पंचायत समितीच्या आमसभा अनुक्रमे १३ व १४ ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर वेंगुर्ला पंचायत समितीच्या आमसभेचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष उपाययोजना
मतदारसंघातील भूमिगत वीजवाहिन्यांच्या प्रश्नावरही केसरकर यांनी माहिती दिली. या भागात सुमारे ५६ टक्के जमीन खडकाळ असल्याने सातत्याने वादळाच्या काळात वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे भूमिगत वीज केबल टाकण्याची मागणी करण्यात आली असून त्यासाठी सुमारे ३२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आपत्कालीन व्यवस्थापनाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच दोडामार्ग तालुक्यातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणपतीपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. आंबोली चौकातील गावांना स्वतंत्र वीजवाहिनी ब्रेकर्स देण्याची मागणीही मान्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी, मळगाव, न्हावेली, निरवडे परिसरासाठी पाणीपुरवठा योजनेला गती
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदेश दिल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
तसेच विधानसभा मतदारसंघातील पाणी व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, आडाळी एमआयडीसी परिसरातील वीज वितरण व्यवस्थाही अधिक सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व विकासकामांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असून, कोकणातील पायाभूत सुविधा, पर्यटन, बंदर विकास आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी आगामी काळात अधिक वेगाने काम केले जाईल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.