जागेचा उपयोग गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी, तसेच तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात-
युवराज लखमराजे भोंसले पत्रकार परिषदेत माहिती
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरात प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला असून, सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी ७० गुंठे जागा विनामोबदला शासनाच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली आहे. या जागेचा उपयोग गोरगरीब जनतेच्या आरोग्यसेवेसाठी व्हावा, तसेच तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राजवाडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत युवराज लखमराजे भोंसले बोलत होते. यावेळी राजघराण्याचे कायदेशीर सल्लागार ॲड. श्यामराव सावंत उपस्थित होते.
लखमराजे भोंसले यांनी सांगितले की, उपजिल्हा रुग्णालयासाठी असलेल्या जागेच्या मालकीबाबत १९८६ पासून न्यायालयीन खटला सुरू होता. इमारत शासनाची आणि जमीन राजघराण्याची असा निर्णय जिल्हा न्यायालयाने यापूर्वी दिला होता. त्यानंतर शासनाने २०२० मध्ये उच्च न्यायालयात अपील केले. त्यावर निर्णय झाला असून ५० गुंठे जमीन राजघराण्याच्या ताब्यात आली आहे.
दरम्यान, उर्वरित ७० गुंठे जागा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी शासनाच्या ताब्यात विनामोबदला देण्यात आली आहे. तसेच इमारतीखालील २० गुंठे जागाही पूर्वीच शासनाच्या ताब्यात असल्याने एकूण ९० गुंठे जागा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल आनंद असल्याचे लखमराजे भोंसले यांनी सांगितले.
मात्र, शासनाने या जागेचा वापर केवळ इमारत उभारण्यासाठी न करता जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक आरोग्य सुविधा तसेच गंभीर आजारांवर उपचार उपलब्ध व्हावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘राजघराण्याने यापूर्वीही जनसेवेसाठी जागा दिल्या’
राजघराण्याकडून सावंतवाडी शहराच्या हितासाठी यापूर्वीही अनेक जमिनी देण्यात आल्या असून, भविष्यातही जनसेवेसाठी ही परंपरा कायम राहील, असे लखमराजे भोंसले यांनी सांगितले. राजघराण्याने शासनाकडे कधीही पैशांची मागणी केलेली नसून केवळ जागेच्या मालकी हक्काचा प्रश्न होता. आता ही जागा जनतेच्या हितासाठी देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसंदर्भात राजघराण्याने कोणतीही हरकत घेतली नव्हती. मात्र, शासनाकडून उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच शासनाकडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन करणे योग्य नव्हते, अशी भूमिका राजघराण्याने घेतली होती.
युवराज लखमराजे भोंसले यांनी सांगितले की, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही यासाठी पुढाकार घेतला असून, लवकरच येथे रुग्णालय उभे राहणार आहे. मुख्यमंत्री आणि शासनाकडून या प्रकल्पाला पूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजघराण्याच्या पूर्वजांचे नाव देण्यास नकार
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारल्यानंतर त्याला राजघराण्याच्या पूर्वजांचे नाव देण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, युवराज लखमराजे भोंसले यांनी कोणतीही अपेक्षा नसल्याचे स्पष्ट केले. ही जमीन जनतेच्या हितासाठी देण्यात आली असून, रुग्णालयाला कोणते नाव द्यायचे, हा निर्णय जनतेचा आणि शासनाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडीच्या जनतेला दर्जेदार आणि सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्यसेवा मिळावी, यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








