सावंतवाडी, दि. २२:
तालुक्यातील नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात आज दुपारी एक थरारक आणि अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव वेगातील आलिशान थार कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चालकाचा ताबा सुटला अन्…
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जीए-०३-एएम-८४७८ (GA-03-AM-8478) या क्रमांकाची थार कार नेमळे मार्गावरून अत्यंत वेगाने जात होती. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास एरंडोकवाडी परिसरात आली असता, अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव कार रस्त्याबाहेर जाऊन जोरदार धडकली. हा अपघात इतका मोठा होता की, कारच्या धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. हे अपघाताग्रस्त वाहन सनी नानोडकर (रा. बारदेश, गोवा) यांच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन तात्काळ बचावकार्य सुरू केले. कारचा चक्काचूर झाल्यामुळे जखमी आतमध्ये अडकले होते, मात्र फर्नांडिस आणि ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
भरधाव वेगाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप
या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात पुन्हा एकदा भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाहनांच्या अनियंत्रित वेगावर आळा घालण्याची गरज असून, वेगावर नियंत्रण नसल्यास क्षणात होत्याचे नव्हते होऊ शकते, याचीच जाणीव या अपघाताने पुन्हा एकदा करून दिली आहे.
सध्या या घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून, पोलीस प्रशासन आणि स्थानिक पातळीवर या अपघाताची जोरदार चर्चा रंगली आहे.







