ठळक घडामोडी

माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथे विनम्र अभिवादन! लोककल्याणाचा दीपस्तंभ’: विक्रांत सावंत(भाईसाहेब यांचे नातू, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य)

माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथे विनम्र अभिवादन

सावंतवाडी | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि लोकनेते कै. ना. भाईसाहेब सावंत यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या माजगाव येथील समाधीस्थळावर त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. भाईसाहेब यांचे नातू, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाईसाहेबांच्या शेकडो चाहत्यांनी समाधीस्थळावर व त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

‘लोककल्याणाचा दीपस्तंभ’: विक्रांत सावंत

याप्रसंगी बोलताना विक्रांत सावंत यांनी भाईसाहेबांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व कृषी क्षेत्राला आपल्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नांनी समृद्ध करणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणून भाईसाहेब सावंत आजही जनमानसात आदराने स्मरले जातात. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या रत्नाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचेच नव्हे, तर हजारो सामान्य लोकांचे आयुष्य उज्ज्वल केले.”

भाईसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात फार महनीय व उल्लेखनीय काम केले आहे, याचा आवर्जून उल्लेख करत विक्रांत सावंत पुढे म्हणाले, “आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या लोककल्याणाच्या दीपस्तंभाला आमचे विनम्र अभिवादन असून, त्यांनी सुरू केलेला हा विकासाचा आणि सेवेचा वारसा आम्ही निश्चितच पुढे नेऊ.” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली.याप्रसंगी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि भाईसाहेबांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.
यावेळी विक्रांत सावंत यांच्यासह पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, अण्णा सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सदस्य सतिश बागवे, संचालक संदिप राणे, सदस्य श्रीम. वसुधा मुळीक, माजी मुख्याध्यापक श्रीम. सोनाली सावंत, के. टी. परब, बाळासाहेब पाटील, जगदीश धोंड, श्री. बोडके, शैलेश नाईक, पी. एम. सावंत, धिरेंद्र जाधव होळीकर, ॲड. शामराव सावंत, एन.ए. देवरकर, रविंद्र म्हापसेकर, संजय कानसे, प्रसाद सावंत, आबा सावंत, आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. सुमेधा नाईक धुरी, पर्यवेक्षक नामदेव मुठे प्रभारी उपप्राचार्य श्रीम. ईश्वरी कांबळे तसेच दोडामार्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एम. पाटील, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माजगांव येथे भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली.
आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे तसेच दोडामार्ग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, चौकूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही यावेळी भाईंच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहिली.