ठळक घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा!पंढरपुरात नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन


पंढरपूर | प्रतिनिधी :


आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा विधीवत केली. मानाचे वारकरी आणि मानाचे दांपत्य यांच्या उपस्थितीत पारंपरिक धार्मिक विधींनुसार महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.
महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूरातील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पादुका मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.


आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असल्याने त्यांच्या निवासाची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या आधुनिक भक्त निवासाची उभारणी करण्यात येत आहे. आळंदी देवस्थानच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे भाविकांना अधिक दर्जेदार आणि सुसज्ज निवास सुविधा उपलब्ध होणार असून, धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.
राज्य सरकारकडून भाविकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत पंढरपूरच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, नव्या भक्त निवासामुळे वारकरी आणि भाविकांसाठी अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण निर्माण होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.