


निरवडे : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आषाढी एकादशीचा पवित्र सण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सजून आकर्षक दिंडी काढत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत ठेवण्याचा सुंदर संदेश दिला.
शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली दिंडी ग्रामपंचायत निरवडेपर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. हातात भगवे झेंडे, तुळशी वृंदावन आणि पालखी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी साकारलेले वारकरी रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
दिंडीमध्ये विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेची भक्तिभावाने पूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संतपरंपरेतील अभंग आणि नामस्मरणातून वारकरी संप्रदायाचा संदेश प्रभावीपणे मांडला. या उपक्रमामुळे परिसर संपूर्णपणे विठ्ठलमय झाला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांची ओळख तसेच भारतीय संस्कृतीतील वारकरी परंपरेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे चेअरमन डॉ. शेखर जैन, मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर, समन्वयक श्री. अजय बांदेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या भक्तिमय दिंडीमुळे निरवडे परिसर विठ्ठलनामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.








