ठळक घडामोडी

कोकणवासीयांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नवीन नियमित एक्सप्रेस आजपासून सेवेत! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थितीत नव्या रेल्वेगाडीला दाखवला हिरवा झेंडा!

खा. नारायण राणे व ना. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मुंबई : कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित एक्सप्रेस रेल्वेसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात या नव्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

CSMT येथे आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोहळ्यात सहभाग घेतला.

ही रेल्वेगाडी दोन्ही दिशांनी दररोज धावणार असून चाकरमान्यांसह कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक १५०८७ ही CSMT ते सावंतवाडी रोड, तर गाडी क्रमांक १५०८८ ही सावंतवाडी रोड ते CSMT दरम्यान धावणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत.

या नवीन रेल्वेसेवेमुळे गणेशोत्सव, दिवाळी तसेच इतर सणांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.