
सावंतवाडी, ता. १० (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील फोंडाघाटवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोमांसाची वाहतूक करणारी एक आर्टिगा कार भीषण अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर धडकून रस्त्याच्या पलीकडे उलटली. या अपघातात कारमधील सुमारे ४०० ते ५०० किलो मांस रस्त्यावर विखुरले.
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, स्थानिक नागरिक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारमधील सर्व मांस जप्त केले. प्राथमिक चौकशीत ही कार कर्नाटकातील व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे.
संशयित चालकाने हे मांस निपाणी येथून आणल्याची माहिती दिली असली, तरी त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने या मांसाची वाहतूक नेमकी कुठे आणि कोणासाठी सुरू होती, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. हे मांस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्याच्या दिशेने नेले जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, संशयिताने यापूर्वीही अशाच प्रकारची वाहतूक केल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात येत असून, सावंतवाडी पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.








