शिक्षकांच्या बदलीविरोधात सोनुर्लीत ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा; ग्रामस्थ आणि पालक आक्रमक
सावंतवाडी:
सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ मधील पदवीधर शिक्षिका सृष्टी धुरी यांचे नाव अतिरिक्त ठरवून समायोजन यादीत समाविष्ट करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात सोनुर्ली येथील ग्रामस्थ, सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रशासनाकडून या गंभीर समस्येची दखल न घेतली गेल्याने अखेरचा पर्याय म्हणून ग्रामस्थांनी उद्या, २३ जूनपासून थेट शाळा बंद आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन सावंतवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांना सादर करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर शाळेत सद्यस्थितीत दोन पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ च्या संचमान्यतेनुसार या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका तथा पदवीधर शिक्षिका सृष्टी धुरी यांना ‘अतिरिक्त’ ठरवण्यात आले असून, त्यांचे नाव समायोजन यादीत टाकण्यात आले आहे.
या तांत्रिक निर्णयामुळे शाळेतील शैक्षणिक दर्जा खालावण्याची आणि विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये शाळेत इयत्ता ६ वी आणि ७ वीची एकूण पटसंख्या २१ इतकी आहे, तसेच पुढील वर्षांतही ही संख्या २१ पेक्षा अधिक राहणार आहे. अशा परिस्थितीत केवळ तांत्रिक निकषांचे कारण पुढे करून शिक्षकांची बदली करण्याचा घाट घातला जात असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
“जोपर्यंत संबंधित शिक्षिका सृष्टी धुरी यांचे नाव समायोजन यादीतून वगळले जात नाही, तोपर्यंत शाळा बंद आंदोलन मागे घेणार नाही.”
— ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती, सोनुर्ली.
या संदर्भात ग्रामस्थांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने यापूर्वी प्रशासनाची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तूस्थिती समजावून सांगितली होती. समायोजन यादीतून शाळेचे नाव कमी करण्याची विनंतीही करण्यात आली होती. परंतु, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाने या रास्त मागणीचा विचार करण्यास स्पष्ट नकार दिला. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेरचा पर्याय म्हणून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
यावेळी निवेदन सादर करताना सोनुर्लीचे सरपंच नारायण तुकाराम हिराप, उपसरपंच भरत जयराम गावकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंजिरी गावकर, उपाध्यक्ष सखाराम कुडतरक, ग्रामपंचायत सदस्य नागेश गावकर, नरेश मोर्ये, अरुण जाधव, तेजस गावकर, विष्णू जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. या निवेदनावर ३५ हून अधिक ग्रामस्थ व पालकांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, प्रशासनाने वेळीच निर्णय न बदलल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.







