ठळक घडामोडी

सावंतवाडी रोड स्थानकावर ‘राजधानी’, ‘गरीब रथ’सह तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेसना थांबा; कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा!


सावंतवाडी | प्रतिनिधी


कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा मंजूर केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण दक्षिण कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
मंजुरीनुसार आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस (12233/12234), तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (12431/12432) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस (12201/12202) या तीन महत्त्वाच्या गाड्या सावंतवाडी रोड स्थानकावर नियमितपणे थांबणार आहेत.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे. तसेच कोकणातील पर्यटनाला चालना मिळून स्थानिक व्यापार व अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळात बंद झालेल्या राजधानी आणि गरीब रथ एक्स्प्रेस पुन्हा सुरू करून त्यांना सावंतवाडी येथे थांबा मिळावा, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना सातत्याने प्रयत्नशील होती. या मागणीसाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून या मागणीची शिफारस केली होती.
या संयुक्त प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली असून, या निर्णयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रवाशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
हा निर्णय कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करणारा ठरणार असून, सावंतवाडी रोड स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.