ठळक घडामोडी

सिंधुदुर्गच्या हर्ष नकाशेने पटकावला ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा बहुमान; कला अकादमी पणजी येथे द्विदशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!

सावंतवाडी
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट-१ आयोजित आणि सम्राट क्लब माशेल यजमान असलेल्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या गोव्याच्या प्रतिष्ठित हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा ग्रँड फिनाले पणजी येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे हे द्विदशकपूर्ती (२० वे) वर्ष होते. या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हर्ष संजय नकाशे याने प्रथम क्रमांक पटकावून ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चे विजेतेपद आपल्या नावावर केले.
गेली २० वर्षे शास्त्रीय संगीताचा प्रसार करणे आणि नवोदित गायकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महान कार्य या स्पर्धेने यशस्वीरित्या केले आहे. यंदा चार प्राथमिक फेऱ्या आणि उपांत्य फेरीतून निवड झालेल्या ६ अंतिम स्पर्धकांनी ग्रँड फिनालेमध्ये आपल्या गायन कौशल्याची अप्रतिम छाप पाडली.

स्पर्धेचा अंतिम निकाल:

  • प्रथम क्रमांक: हर्ष संजय नकाशे (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
  • द्वितीय क्रमांक: पुतराज वेंकटपूरमठ (गदग, कर्नाटक)
  • तृतीय क्रमांक: मल्हार बाळकृष्ण मराठे (सांगे-गोवा)

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला गोव्याचे कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. राम देशपांडे हे महागुरू व विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर महागुरू पंडित राम देशपांडे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शास्त्रीय गायनाने उपस्थित रसिक प्रेक्षक भारावून गेले.
समारोप आणि बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर उपस्थित होते.
या दिमाखदार सोहळ्याला सम्राट क्लब आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
सम्राट संदीप निगळ्ये (आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल)सम्राट शशिकांत पुनाजी (अध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १)सम्राट विनोद मळीक (सचिव, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १)सम्राट सुबोध रामनाथकर (कोषाध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १)सम्राट रोहन घाडी (अध्यक्ष, यजमान क्लब – सम्राट क्लब मार्शेल),नरेश पेडणेकर (अध्यक्ष, मये क्लब), मंगेश गांवकर आणि सौ. स्वप्ना मातोंडकर आदींचा समावेश होता.

या द्विदशकपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या उभारणीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.संस्थापक सम्राट सागर पानवेलकर, अक्षय खांडेपारकर, प्रसाद नाईक, योगेश हिरवे, भालचंद्र नाईक, दीपक टिळवे, गुरूदास नाटेकर, दीपक नार्वेकर, राजश्री खांडेपारकर, अविन नाईक, प्रसाद प्रभूगांवकर, अमोल फडते वेतकीकर, ॲड. अवधूत सलतकी, मंगेश गांवकर, अवधूत नाईक, पंकज नमशीकर, भालचंद्र नार्वेकर, अर्चना सिनारे, निखिल साळगांवकर आणि स्वप्ना मातोंडकर.

या भव्य संगीत सोहळ्याला गोव्यातील व परिसरातील संगीतप्रेमी, शिक्षक, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्गच्या हर्ष नकाशे याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.