ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदात्यांनी वाचविले तिघांचे प्राण.
कुटुंबाकडून,रक्तदात्यांचे व संस्थेचे मानले आभार.
सावंतवाडी,
. २४ जून २०२५ रोजी गोवा मेडिकल कॉलेज (GMC), बांबोळी येथे तीन पेशंट वेगवेगळ्या उपचारासाठी दाखल झाले होते.
ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गच्या सहा रक्तदात्यांनी रक्ताच्या गरजेची माहिती मिळताच तातडीने GMC रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले आणि या तिन्ही पेशंटना जीवनदान दिले.
सर्वप्रथम तुळस, ता. वेंगुर्ला येथील प्रल्हाद केशव राणे यांना एका मोठया शस्त्रक्रियेचेवेळी तुलनेने कमी प्रमाण असलेल्या एबी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या चार युनिट्सची आवश्यकता होती. त्यावेळी या पेशंटसाठी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते आनंद देसाई (बांदा) यांनी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.
त्याचप्रमाणे कास ता. सावंतवाडी येथील देविदास पंडीत यांना बायपास शस्त्रक्रियेच्यावेळी सहा रक्तदात्यांची आवश्यकता होती. त्यावेळी संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते अमोल परब (शिरशिंगे), प्रशांत निरवडेकर (निरवडे) आणि हर्षद मोर्जे (वेंगुर्ला) या तिघांनी रक्तदान केले. हर्षद मोर्जे यांनी आपल काम बाजूला ठेवून तत्काळ जाऊन रक्तदान केले. अमोल परब( शिरशिंगे )व प्रशांत निरवडेकर यांनी स्वतः जाऊन रक्तदान केलं.
त्यानंतर मातोंड ता. वेंगुर्ला येथील सावित्री सीताराम परब या पेशंटसाठी सुद्धा तातडीची रक्ताची गरज असताना मातोंडचेच देवेश परब व सांगेलीचे अमित जडये या दोघाही ऑन कॉल रक्तदात्यांनी आपल महत्त्वाचं काम बाजूला ठेवून, तत्काळ GMC रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. असे हे संस्थेचे थोर रक्तदाते, रक्ताच्या गरजेची माहिती मिळताच जसे जमेल तसेच, लवकरात लवकर रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करतात व रुग्णाचा बहुमोल जीव वाचवितात. आणि या रक्तदात्यांच्या जीवावरच संस्थेचे कार्य निरंतर सुरु आहे.
रक्ताच्या गरजेसाठी हाक देताच ताबडतोब रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान करुन पेशंट्सना जीवदान देण्याचे पुण्यकर्म केल्याबद्दल तिन्ही पेशंटांच्या नातेवाईकांनी सर्व रक्तदात्यांसहित रक्ताची गरज पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. तसेच ऑन कॉल रक्तदाते संस्थेलाही धन्यवाद दिले.
ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग ही संस्था अशाच प्रकारे तातडीच्या प्रसंगी रक्तदाते पाठवून रुग्णांचे बहुमोल जीव वाचविण्याचे सत्कार्य करीत आहे.
रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जीवावर उदार होऊन रक्तदान करणाऱ्या संस्थेच्या सर्वच रक्तदात्यांचा संस्थेला सार्थ अभिमान वाटतो, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी म्हटले आहे.







