वैभववाडी(आचिर्णे) प्रतिनिधी:
निवृत्तीनंतरही आपल्या शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवत रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे येथील माजी मुख्याध्यापक श्री. रामकृष्ण मेघश्याम देसाई यांनी विद्यालयासाठी अनमोल योगदान दिले आहे.
विद्यालयाचा परिसर अधिक सुंदर, आकर्षक आणि हिरवागार व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने देसाई सरांनी विद्यालयाला ५० विविध प्रकारची फुलझाडे भेट दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यालय परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून विद्यार्थ्यांना निसर्गाशी अधिक जवळीक साधण्याची संधी मिळणार आहे.
यासोबतच विद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांना हातभार लागावा, या उद्देशाने देसाई सरांनी ₹१०,०००/- ची रक्कम कायम ठेव स्वरूपात दिली. निवृत्तीनंतरही शाळेच्या प्रगतीसाठी असलेली त्यांची तळमळ आणि शाळेप्रती असलेली आत्मीयता या योगदानातून पुन्हा एकदा दिसून आली आहे.
याचवेळी शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करत इयत्ता दहावीमध्ये हिंदी विषयात विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थिनी कु. ऋतुजा घेरडे हिचा श्री. देसाई सर यांच्या हस्ते ₹१,०००/- चे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तिच्या यशाचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
निवृत्तीनंतरही शाळेच्या प्रगतीसाठी असलेली देसाई सरांची तळमळ, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाबाबतची त्यांची जागरूकता निश्चितच प्रेरणादायी असल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या अनमोल योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे परिवारातर्फे श्री. रामकृष्ण मेघश्याम देसाई सरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी श्रीपाद घाडी , मंदार काका (शिक्षकेत्तर कर्मचारी), श्री. सुरेश घेरडे श्री. गणेश सावंत, नर्सरी मालक सुंदर झोरे अन्य मान्यवर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्याध्यापक श्री. रामकृष्ण मेघश्याम देसाई .श्रीपाद घाडी , मंदार काका (शिक्षकेत्तर कर्मचारी), श्री. सुरेश घेरडे श्री. गणेश सावंत सर, सुंदर झोरे अन्य मान्यवर







