ठळक घडामोडी

चवींचा उत्सव आणि खेळांची धम्माल …संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘फूड फेस्टिवल’ उत्साहात संपन्न!

चवींचा उत्सव आणि खेळांची धम्माल …
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘फूड फेस्टिवल’ उत्साहात संपन्न!


निरवडे (प्रतिनिधी):


विद्यार्थ्यांमध्ये पाककलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना व्यावसायिक गणितासोबतच आरोग्याविषयी जागरूकता मिळावी, या उद्देशाने संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे नुकताच भव्य ‘फूड फेस्टिवल’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन निरवडे गावच्या सरपंच सौ. सुहानी गावडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मैदान विविध खाद्यपदार्थांच्या खमंग सुवासाने दरवळून गेले होते. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या महोत्सवात भाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः घरी बनवलेले विविध पौष्टिक पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.


या महोत्सवात,चटपटीत भेळ,चायनीज भेळ, परोठे, आलू चॅट,थालीपीठ, सँडविच, फळांचे ज्यूस, फ्रेंच फ्राईस, कटलेट, फ्रुट सॅलड, पाणीपुरी चॅट,भुंगळा बटाटा आणि विविध पारंपरिक कोकणी पदार्थांचे तसेच विविध स्टॉल्स लावले होते. केवळ खादय पदार्थ विक्रीच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी स्वतः हिशोब ठेवणे, गिऱ्हाइकांशी बोलणे आणि मार्केटिंग करणे अशा व्यावसायिक कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. घरगुती आणि पौष्टिक अन्नाला प्राधान्य देण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे नियम पाळून पदार्थांची विक्री केली.
या फूड फेस्टिवलला पालक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.”पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगाची ओळख व्हावी, यासाठी आम्ही दरवर्षी असे उपक्रम राबवतो. या महोत्सवामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि संघभावना वाढण्यास मदत होते,” असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. प्रणाली रेडकर मॅडम यांनी व्यक्त केले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.