सावंतवाडी, प्रतिनिधी :
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने दर्शविली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी प्रा. बागवे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान गेली सहा वर्षे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना २४ तास विनामूल्य सेवा देत असून, वादळी पावसामुळे रस्त्यावर किंवा घरांवर पडणारी झाडे स्वखर्चाने हटविणे, पूरग्रस्तांना तातडीची मदत व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे अशा विविध सेवाभावी कार्यात संस्था सातत्याने सक्रिय आहे. संस्थेच्या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रतिभा वराळे यांचीही भेट घेतली. यावेळी सावंतवाडी समाज मंदिर येथे कार्यरत असलेल्या दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत संस्थेच्या सदस्या रूपा मुद्राळे यांनी सहकार्याची विनंती केली. यावर उपजिल्हाधिकारी वराळे यांनी दिव्यांग मुले व त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही नोंदणीकृत संस्था असून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. यंदाही पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनासोबत समन्वय साधून नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम आणि रवि जाधव उपस्थित होते.







