देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धेत लहान गटात पाचवी तर मोठ्या गटात नववी ब प्रथम
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेचे आयोजन
सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धेत लहान गटात प्रशालेच्या इयत्ता पाचवी तर मोठ्या गटात इयत्ता नववी ब च्या वर्गाने प्रथम क्रमांक पटकाविला.
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १४ आॉगस्ट रोजी देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ स्वातंत्र्य दिनी १५ आॉगस्ट रोजी पार पडला. यावेळी मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव आर. आर. राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, संस्था संचालक रामचंद्र केळुसकर, दीपक जोशी, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, सहाय्यक शिक्षक ओमप्रकाश तिवरेकर, संदीप कारिवडेकर, आनंदी मोर्ये, स्वातंत्र्य सैनिक संजय तेली उपस्थित होते. यावेळी भारतीय सैन्यादलामध्ये तोफखाना ग्रुपमध्ये १६ वर्षे सेवा करणारे मळगावचे सुपुत्र संजय तेली यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नवभारत साक्षरता अभियानमध्ये उत्तीर्ण झालेल्या महिला शुभांगी लातये, गौरी सावळ, मंजिरी सावळ, रत्नमाला जाधव या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धेत लहान गट प्रथम क्रमांक इयत्ता पाचवी, द्वितीय क्रमांक इयत्ता सातवी, तृतीय क्रमांक इयत्ता सहावी तर मोठ्या गटात प्रथम इयत्ता नववी ब, द्वितीय क्रमांक इयत्ता आठवी वी ब व इयत्ता दहावी वी ब, तृतीय क्रमांक इयत्ता दहावी वी अ, उत्तेजनार्थ इयत्ता इयत्ता नववी अ व आठवी अ यांना देण्यात आला. प्रथम क्रमांकाच्या रोख रक्कमेची बक्षीसे प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, द्वितीय क्रमांकाची रोख रक्कमेची बक्षीसे पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, तृतीय क्रमांक व उत्तेजनार्थाची रोख रक्कमेची बक्षीसे संदीप कारिवडेकर व आनंदी मोर्ये यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच वाद्यवृंदकांना रोख रक्कम प्रवीण नाईक व प्रिया नाईक यांनी १००१ रू दिले. यावेळी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक ओमप्रकाश तिवरेकर यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदी मोर्ये तर आभार संदीप कारिवडेकर यांनी मानले.








