सावंतवाडी (प्रतिनिधी):
येथील सबनिसवाडा-न्यू सबनिसवाडा भागातील श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सावंतवाडी यांच्या वतीने भव्य ‘कलशारोहण सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. ३० मार्च ते गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न होणार आहे.
चार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम
या सोहळ्याची सुरुवात सोमवार, ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य ‘कलश दिंडी’ने होणार आहे. ही दिंडी मराठी शाळा क्र. ४ पासून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत मंदिरात विसावेल. रात्री ८ वाजता श्रींची आरती होईल.
मंगळवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी शांतीपाठ, प्रायश्चित विधी, गणेश पूजन व अग्निस्थापना असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. दुपारी महाप्रसादाचे वाटप होईल, तर सायंकाळी सौ. मंजिरी धोपेश्रवरकर यांचा ‘भक्तीरंग’ हा भक्तीगीतांचा कार्यक्रम आणि रात्री ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा नाट्यसंगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
बुधवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी तुळशीपूजा व पवमान अभिषेक करण्यात येतील. सायंकाळी श्री. योगेश सावंत यांचा ‘स्वरनाद’ आणि रात्री श्री. किरण सिद्धये संचलित अभिनव संगीत मंडळाचा ‘स्वरधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
मुख्य कलशारोहण सोहळा
सोहळ्याचा मुख्य दिवस गुरुवार, २ एप्रिल २०२६ (चैत्र शुद्ध पौर्णिमा) रोजी असून, सकाळी ८ वाजेपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात होईल. दुपारी १२ वाजून १ मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर कलशारोहण विधी संपन्न होणार आहे.
हा सोहळा श्रीमत् प.पू. विद्यानारायण स्वामी महाराज, श्रीमत् प.पू. शरद जोशी महाराज, श्रीमत् प.पू. दयानंद भारती स्वामी महाराज आणि माजी शिक्षणमंत्री आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते पार पडणार आहे.
भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन
कलशारोहणानंतर दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ह.भ.प. स्नेहप्रदीप प्रभाकर सामंत यांचे कीर्तन आणि रात्री ‘नादब्रह्म’ गाण्यांच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता होईल. या सर्व मंगलमयी कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष श्री. दयानंद दत्ताराम गवस, सचिव श्री. खेमराज कुडतरकर, खजिनदार श्री. सुधीर धुमे व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.









