सावंतवाडी
तळवडे पंचक्रोशीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, यामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या सेवेमुळे ग्राहक हैराण झाले असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे.
तळवडे बाजारपेठ येथील बीएसएनएलचा टॉवर सध्या ‘बिनभरोशाचा’ झाला आहे. या टॉवरची योग्य वेळी देखभाल आणि दुरुस्ती (मेंटेनन्स) केली जात नसल्याने तांत्रिक बिघाड होऊन सेवा वारंवार ठप्प होत आहे. सध्याचे युग हे डिजिटल कनेक्टिव्हिटीचे असताना, सरकारी मालकीच्या या कंपनीची सेवा ढेपाळल्याने व्यापारी, विद्यार्थी आणि ऑनलाइन काम करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह सेवा विस्कळीत झाल्याबाबत तक्रारी करूनही बीएसएनएल प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. अधिकारी आणि कर्मचारी या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल मागे पडत असताना, उपलब्ध सेवा तरी दर्जेदार मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तात्काळ सुधारणेची मागणी तळवडे बाजारपेठेतील टॉवरची तातडीने दुरुस्ती करून ही सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. जर येत्या काही दिवसांत सेवा सुरळीत झाली नाही, तर ग्राहक आक्रमक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून दुर्गम भागातील ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.







