माणुसकीचा विजय! मधमाशांचा हल्ला झेलत तरुणांनी वाचवले दरीत कोसळलेल्या कुटुंबाचे प्राण
सावंतवाडी | प्रतिनिधी
लग्नाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घालण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक तरुणांच्या अतुलनीय धैर्यामुळे एका मोठ्या अनर्थाची टाळला. मळगाव घाटात इको कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात, चवताळलेल्या मधमाशांचा डंख सोसत १० तरुणांनी देवदूतासारखे धावून जात चौघांचे प्राण वाचवले.
आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सालईवाडा येथील एक कुटुंब विवाह सोहळा आटोपून आपल्या घरी परतत होते. मळगाव घाटातील धबधब्याजवळ धोकादायक वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि क्षणार्धात ही इको कार रस्ता सोडून थेट खोल दरीत कोसळली. कार दरीत कोसळताच झालेल्या मोठ्या आवाजाने परिसर हादरून गेला.
मधमाशांचा अडथळा, पण तरुणांचे जिद्दी पाऊल
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीसाठी दरीकडे धाव घेतली. मात्र, बचावकार्य सुरू असतानाच एका झाडावरील मधमाशांचे पोळ अनावधानाने चाळवले गेले. चवताळलेल्या मधमाशांनी बचावकर्त्यांवर हल्ला चढवला. शरीरावर मधमाशांचे डंख बसत असतानाही, जखमींचा आक्रोश ऐकून या तरुणांनी माघार घेतली नाही. जखमींना सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये आणि सचिन हरमलकर या तरुणांनी स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत जखमींना कारच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच ‘१०८’ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सावधानता बाळगण्याचे आवाहन:
मळगाव घाटातील धोकादायक वळणांवर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. या घटनेमुळे घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांनी घाटातून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.







