ठळक घडामोडी

मुंद्रा पोर्टच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंदरांचा विकासअत्याधुनिक व्यवस्थापनाचा अभ्यास; जागतिक दर्जाच्या सुविधा राज्यात आणण्याचा मंत्री नितेश राणे यांचा निर्धार


मुंबई | प्रतिनिधी


महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गुजरातमधील देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक बंदर व्यवस्थापन आणि पायाभूत विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्रातील बंदरांचा सर्वांगीण, आधुनिक आणि स्पर्धात्मक विकास करण्यासाठी हा अभ्यास दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यात मंत्री राणे यांनी बंदरातील अत्याधुनिक कंटेनर हाताळणी व्यवस्था, यांत्रिकीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, मालवाहतूक व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स नेटवर्क, साठवण सुविधा तसेच जहाजांच्या जलद हालचालीसाठी उभारण्यात आलेल्या आधुनिक यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. कार्यक्षम नियोजन, वेगवान सेवा आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनामुळे मुंद्रा पोर्टने देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.
या पाहणीदरम्यान अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण गौतम अदानी उपस्थित होते. त्यांच्या समवेत बंदर विकास, सागरी वाहतूक, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, खाजगी गुंतवणुकीच्या संधी तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये बंदर क्षेत्राची वाढती भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्रातील बंदरे अधिक सक्षम, कार्यक्षम आणि जागतिक दर्जाची करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना, आधुनिक उपकरणांचा वापर, लॉजिस्टिक्स साखळी मजबूत करणे, मालवाहतुकीची क्षमता वाढविणे आणि बंदरांशी संलग्न औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या विविध मुद्द्यांवरही विचारविनिमय करण्यात आला.
महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदरांची क्षमता लक्षात घेता राज्यातील बंदरांचा आधुनिक पद्धतीने विकास करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. देशातील आणि जगातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धती महाराष्ट्रात राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यामुळे राज्यातील सागरी व्यापाराला गती मिळेल, गुंतवणूक वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंद्रा पोर्टचा हा अभ्यास दौरा महाराष्ट्रातील बंदर विकासासाठी नवी दिशा देणारा ठरेल. आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि जागतिक दर्जाच्या सुविधांच्या माध्यमातून राज्यातील बंदरे अधिक सक्षम व स्पर्धात्मक बनविण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी अधोरेखित केले.