निरवडे प्रतिनिधी
निरवड्यातील संस्कार नॅशनल शाळेमध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून भाग घेतला. मुला-मुलींनी एकमेकांना राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण जपली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ प्रणाली रेडकर मॅडम यांनी केली. त्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगताना, हा सण केवळ बहीण-भावाच्या प्रेमाचा नसून, कोणत्याही व्यक्तीबद्दल आदर आणि संरक्षणाची भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे, असे सांगितले.
यानंतर, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर राख्या एका प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. मुला-मुलींनी एकमेकांच्या मनगटावर राख्या बांधल्या आणि पारंपरिक गाणी सादर केली. या वेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता.

कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप केले. या आनंदमय वातावरणात लहान मुलांनी एकत्र येऊन सणाचा आनंद घेतला. या कार्यक्रमामुळे मुलांना भारतीय संस्कृतीची आणि नात्यांची ओळख झाली. मुख्याध्यापकांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.








