
मुंबई | प्रतिनिधी :
राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मच्छिमारांना खोल समुद्रातही किनाऱ्याशी अखंड संपर्क साधता यावा, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत मच्छिमारांच्या सुरक्षिततेला शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “राज्यातील मच्छिमारांचे प्राण आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी सॅटेलाईट फोन सुविधा मच्छिमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था ठरेल. बीएसएनएलच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून, त्यामुळे समुद्रातील सुरक्षा, बचावकार्य आणि संप्रेषण अधिक प्रभावी होईल.”
बैठकीत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिस (GSPS) चे सादरीकरण करत या तंत्रज्ञानाची कार्यपद्धती, कव्हरेज, उपकरणांची वैशिष्ट्ये आणि खोल समुद्रात संपर्क राखण्यातील उपयुक्ततेची माहिती दिली.
सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून मोबाईल नेटवर्क नसलेल्या समुद्रातील दुर्गम भागातही सातत्यपूर्ण संपर्क राखता येणार आहे. खराब हवामान, यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर संकटांच्या वेळी तातडीने मदत मागविणे शक्य होणार असून, किनाऱ्याशी संपर्क कायम राहिल्यामुळे बचाव यंत्रणेलाही जलद प्रतिसाद देणे सुलभ होईल.
राज्य शासनाच्या ‘मच्छिमार सुरक्षा प्रथम’ या धोरणानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सॅटेलाईट फोन सुविधा सुरू झाल्यास खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या हजारो मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार असून, समुद्रातील संप्रेषण अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यास मदत होईल. यामुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, बीएसएनएलचे वरिष्ठ व्यवस्थापक सुहास मानकर तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







