ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर; पावसाअभावी संकटात सापडलेल्या भातशेतीची केली पाहणी

तळेरे :

जिल्ह्यात पावसाने अचानक दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडून भाताची रोपे करपू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गुरुवारी कणकवली तालुक्यातील तळेरे येथील वाघाचीवाडी परिसरात प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री राणे यांनी शेतकरी देवीदास चव्हाण व इतर शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बोलताना ना. नितेश राणे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष शेतात आलो आहोत. प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्या निकषांनुसार मदत देता येईल, याचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक ती पावले उचलली जातील. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन सकारात्मक असून शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

या पाहणीवेळी माजी जिल्हा परिषद सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार, कणकवली मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, माजी सभापती बंडया मांजरेकर, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपकृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार, भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ. विजयकुमार शेटये, पोलिस पाटील चंद्रकांत चव्हाण, मिठबावचे सरपंच भाई नरे, ग्रामपंचायत सदस्य रिया चव्हाण तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.