ठळक घडामोडी

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा; सावंतवाडी संस्थानकडून ७० गुंठे जागा विनामोबदला सुपूर्द! सावंतवाडीकरांचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर पूर्णत्वास; युवराज लखमराजे भोंसले यांची माहिती

सावंतवाडी, ता. २० : गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडीकरांचे स्वप्न असलेले प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालयासाठी आवश्यक जागेचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून यशस्वीरीत्या मार्गी लागला आहे.

जनहिताचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून सावंतवाडी राजघराण्याचे सर्वेसर्वा खेम सावंत शिवराम सावंत भोंसले यांनी शहरातील अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेली कोट्यवधी रुपये किमतीची ७० गुंठे जागा महाराष्ट्र शासनाला पूर्णपणे विनामोबदला हस्तांतरित केली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे खेम सावंत भोंसले यांनी दिली.

राजघराण्याच्या या निर्णयामुळे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीतील महत्त्वाचा अडसर दूर झाला असून, आता रुग्णालय प्रत्यक्षात उभारण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे युवराज लखमराजे भोंसले यांनी स्पष्ट केले.

सदर जागेच्या मालकी हक्काबाबत कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सावंतवाडी संस्थानच्या कुटुंबीयांनी वेळेत आवश्यक ती सर्व प्रतिज्ञापत्रे सादर केली. त्यामुळे जागेच्या प्रश्नावर तोडगा निघण्यास मदत झाली.

जनहिताला प्राधान्य

सावंतवाडी शहर व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा व्यापक जनहिताचा विचार करून ही जागा शासनाला विनामोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेली ही जागा रुग्णालयासाठी उपलब्ध झाल्याने सावंतवाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सावंतवाडी व परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गोवा, कोल्हापूर किंवा अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता जागेचा प्रश्न सुटल्याने या रुग्णालयाच्या प्रत्यक्ष उभारणीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सावंतवाडी संस्थानच्या या निर्णयामुळे शहराच्या आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, सावंतवाडीकरांचे बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या मार्गावर आले आहे.