ठळक घडामोडी

सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी

सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी

सावंतवाडी, दि. १५ : सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि. १६ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’ मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहादरम्यान विविध भजनी मंडळे, कीर्तनकार आणि संगीतप्रेमींच्या सहभागातून भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल मंदिर उत्सव समितीने केले आहे.

सप्ताहात दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिला मंडळांचे भजन, तर सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वारकरी भजन, हरिकीर्तन आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडीसह बांदा, वेंगुर्ले आणि परिसरातील विविध भजनी मंडळे व कलाकार आपल्या भक्तिसेवेचे सादरीकरण करणार आहेत.

सप्ताहाची सांगता दि. २३ जुलै रोजी महाप्रसादाने होणार आहे. तसेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे काकड आरती, श्रींची महापूजा आणि सायंकाळी हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली.

संपूर्ण सप्ताहात भाविकांनी श्री विठ्ठल-रखुमाईंचे दर्शन घेऊन हरिनामाच्या भक्तिरसात सहभागी व्हावे, असे आवाहन विठ्ठल मंदिर स्थानिक देवस्थान समिती आणि विठ्ठल मंदिर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.