ठळक घडामोडी

गणेशोत्सवापूर्वी पथदिवे दुरुस्त करा अन् खड्डे बुजवा! तळवडेत युवकांचे ग्रामपंचायतीला निवेदन

सावंतवाडी:
तळवडे गावातील सर्व प्रभागांमधील बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत आणि बांदिया पुलाजवळील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, या मागणीसाठी तळवडे येथील युवकांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ग्रामविकास अधिकारी सद्गुरू गावडे व प्रशासक एकनाथ सावंत यांना हे निवेदन देऊन सणासुदीच्या काळात ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
तळवडे गावातील विविध प्रभागांमधील पथदिवे गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना अंधारातून ये-जा करावी लागत असून चोरी आणि अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे. गावात लवकरच वार्षिक हरिनाम सप्ताह सुरू होत असून पाठोपाठ गणेशोत्सवही तोंडावर आला आहे. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुढील ४ ते ५ दिवसांत सर्व पथदिवे दुरुस्त करून पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तळवडे खेरवाडी बांदिया पुलाजवळील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर

तळवडे-कुंभारवाडी-नेमळे मार्गावरील बांदिया पुलाच्या नवीन बांधकामा दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदाराशी त्वरित संपर्क साधून गणेश चतुर्थीपूर्वी हे खड्डे बुजवावेत, असेही निवेदनात नमूद केले आहे.

हे निवेदन ‘समस्त युवक वर्ग तळवडे’च्या वतीने रोहन परब, शुभम परब, शंकर कुंभार, योगेश कुंभार, सागर कांडरकर, प्रितेश जाधव, रोहित जाधव आणि संदीप सावंत यांच्या उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी सद्गुरू गावडे व प्रशासक एकनाथ सावंत यांना सादर करण्यात आले. सणापूर्वी ही कामे मार्गी लावावी असे निवेदनात दिले आहे.